• Savitribai Phule Kavita Poem in Marathi सावित्रीबाई फुले कविता

  savitribai phule chya kavita charolya mahiti kary essay nibandh

  Savitribai Phule Kavita Poem in Marathi सावित्रीबाई फुले कविता

  होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
  एरव्ही बोललेही नसते,
  पण माझ्या विचारांचे
  तुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय.
  चक्क माझी देवी बनवून
  मला फोटोमध्ये फ्रेम केलेय.

  जमेल तेंव्हा,जमेल तसे
  माझे सोईनुसार कौतुक करता.
  खरे दु:ख याचे की,
  तुम्ही मला गृहित धरता.
  त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय..
  होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....

  कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा,
  सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात.
  ज्या माझ्या वारसा सांगतात,
  त्याच बेईमान झाल्यात.
  असे होईल,मला काय माहित?
  मला कुठे पुढचे दिसले होते?
  एका वेगळ्या जगासाठी
  मी शिव्याशाप,
  दगडाबरोबर शेणही सोसले होते.
  तुमच्याच शब्दात सांगायचे तर
  रात्रंदिवस घासले होते.
  आज मी कसले घाव झेलतेय?
  होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....

  ही काही उपकाराची भाषा नाही.
  आजच्या बाजारू समाजसेवेसारखा
  हा बेंडबाजा अगर ताशा नाही.
  मी विसरून गेले होते,
  आम्ही कोणकोणते विष पचवले आहे.
  हल्ली मात्र तुम्ही 
  आमच्या आत्मसन्माला डिचवले आहे.
  म्हनूनच तुमच्या बहिर्‍या कानी
  हे गार्‍हाणे घालतेय.
  होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

  माय मावल्यांनो,लेकीबाळींनो.
  तुम्ही शिकलात सवरलात.
  पण नको तेवढ्या शहाण्या झालात.
  विकृत स्त्रीमुक्तीच्या
  प्रत्येकजणी कहाण्या झालात.
  माझा वारसा सांगून,
  स्वार्थासाठी राबता आहात.
  या सगळ्या संतापापुढे
  आज मी भिड्भाड भुलतेय.....
  होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

  बाईपणाचे दु:ख काय असते?
  मी तुमच्यापेक्षा जास्त भोगलेय.
  आरशात पाहून सांगा,
  मी सावित्रीच्या शब्दाला जागलेय?
  तकलादू आणि भंपक
  स्त्रीमुक्तेची नशा
  तुम्हांला आज चढली आहे.
  कपडे बदलेले की,
  पुरोगामी होता येते,
  ही फॅशन तुम्ही पाडली आहे.
  शिकली सवरलेली माझी लेक
  संस्कृतीच्या नावाखाली
  नाकाने कांदे सोलतेय..
  होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

  मान नको,पान नको,
  आमचे उपकारही फेडू नका.
  किर्तन-बिर्तन काही नको
  झोडायची म्हनून
  भाषणंही झोडू नका.
  वाघिणीचे दूध पिऊन
  कुत्र्यांसारखा गोंडा घोळीत आहात.
  धर्म-संस्काराच्या नावाखाली
  टाकाऊ परंपरा पाळीत आहात.
  तुमच्या चिपाडलेल्या डोळ्यात
  म्हनूनच हे अंजन घालतेय...
  होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

  तुम्हांला आज 
  काहीसुद्धा सोसायचे नाही.
  काढणारे काढीत आहेत
  तुम्हांला शाळा काढीत बसायचे नाही.
  तुम्ही फक्त पुरोगामित्त्वाचा 
  खरा वसा घ्यायला पाहिजे.
  एखादा दुसरा ’यशवंत’ शोधून
  त्याला आधार द्यायला पाहिजे,
  शाळा कॉलेजचे पिक तर
  हायब्रिडसारखे डोलतेय.....
  होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

  मनमानी आणि स्वैराचाराला
  पुरोगामित्त्वाचे लेबल लावणे,
  यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही.
  फक्त नवरे बदलणे,
  घटस्फोट घेणे,
  ही काही स्त्रीमुक्ती नाही.
  माझी खरी लेक तीच,
  जी सत्यापूढे झुकत नाही.
  सावित्री आणि ज्योतिबांपूढे
  आंधळेपणाने माथा टेकत नाही.
  माझी खरी लेक तीच,
  आम्हांलासुद्धा नव्याने तपासून
  स्वत:ची भाषा बोलतेय.
  आमचाही वसा
  तावून-सुलाखुन पेलतेय.....
  होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

  आमच्याच मातीत,
  आमच्याच लेकरांकडून
  दूजाभाव बघावा लागला.
  माझा फोटो लावण्यासाठीही
  सरकारी जी.आर.निघावा लागला.
  आपल्या सोईचे नसले की,
  विचारांकडेही कानाडॊळा होतो.
  समाजासाठी काही करायचे म्हटले की,
  पोटात प्लेगचा गोळा येतो.

  ज्योतिबांशिवाय सावित्री,
  सावित्रीशिवाय ज्योतिबा,
  समजून घेता येणार नाही.
  विचारांची ही ज्योती,
  एकटी-एकटी नेता येणार नाही.
  सुनांना लागावे म्हणून तर
  लेकींनो, तुम्हांला बोलतेय....
  होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय...
  आता तुम्ही तुमचे फोटो कविता जोक्स माहिती इ. आम्हाला पाठवू शकता..
  तुमच्या नावा सहित Facemarathi Blog मध्ये publish केले जाईल
  Email : komal8pat@gmail.com

  Fashion

  Beauty

  Travel